


खड्ड्यावरून बांधकाम व गोसेखुर्द विभागाचे एकमेकांकडे बोट
मागील पंधरवड्यातील संततधार पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचा मोठा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. पालेबारसा ते उसरपार चकदरम्यान गोसेखुर्द कालव्याच्या पुलालगतच्या खड्यांमुळे आठ दिवसांपासून गडचिरोली- पालेबारसा-गेवरा,सिंदेवाही-पालेबारसा-जनकापूर, चिमूर -पालेबारसा-गडचिरोली या बसफेऱ्या बंद आहेत. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून श्रमदानातून खड्डे बुजविण्याचे काम केले.
सावली तालुक्यातील उसरपार चक-पालेबारसा दरम्यान असलेल्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या पुलावरील उत्तारावर दरवर्षी पावसाळ्यात अपघाताचा आमंत्रण देणारे खड्डे पडत असतात. मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करून काम चालविले
रस्त्यावरील खड्डे बुजविताना विद्यार्थी व शिक्षक. जात आहे. मात्र या वेळेस ऐन पावसाळ्यात पुलाजवळ जीवघेणे खड्डे पडल्याने बस वाहतूक आठ दिवसांपासून बंद झाली होती. त्यामुळे पालेबारसा व पाथरी येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचीही मोठी अडचण निर्माण झाली होती. ही बाब स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वैभव गुज्जनवार यांच्या लक्षात आल्याने सामाजिक बांधिलकीची उब देत येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांना घेऊन ते रस्त्यावर उतरले व श्रमदानातून गिट्टी मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत करून घेतला. यावेळी पालेबारसाचे माजी सरपंच रमेश खेडेकर, इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक लोखंडे, शिक्षक अगडे, लेंझे, चुधरी, स्कूल बसचालक वाकडे यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.
पालेबारसा ते उसरपार चक. दरम्यान गोसेखुर्द कालव्या वरील पुलाच्या दोन्ही बाजुला कच्चा रस्ता असल्याने दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात,बाबत संबंधित बांधकाम विभाग व गोसेखुर्द प्राधिकरण यांच्या लक्षात आणुन देण्यात आले.परंतु दोन्ही विभाग एकमेकांकडे. बोट दाखवित आहेत. जबाबदारी घेवुन कायमस्वरुपी रस्ता दुरुस्ती करावा.
श्री वैभव गुज्जनवार.
सामाजिक कार्यकर्ते.पाथरी.